अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरात सुरू केले सुसज्ज ग्रंथालय.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरात सुरू केले सुसज्ज ग्रंथालय.
- स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी अनेक पुस्तके केली उपलब्ध; प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घ्यावा एसपींचा आदर्श.
- स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थांच्या हातात मोबाइलऐवजी पुस्तके दिसली पाहिजेत तरच यशाची पायरी चढता येईल.
- विद्यार्थी पुस्तकांच्या सान्निध्यातूनच जडण घडण होऊन विद्यार्थ्यांत वाचन व अभ्यासाची गोडी निर्माण होते. म्हणून ग्रामीण भागात आपण सर्वप्रथम ग्रंथालयाला प्राधान्य दिले. जेव्हा जेव्हा मी गावाकडे येत असतो तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशाचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न करत असतो भविष्यात अद्ययावत अभ्यासिकेला बनविण्यास प्राधान्य देणार आहे.
- अनिल म्हस्के,अतिरिक्त पोलिस अधीक्षक
देऊळगावराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – ग्रामीण भागाततील तरुण यशस्वी झाला की आपल्या मूळ गावाला विसरतो; मात्र काही अपवाद वगळता समाजाची जान म्हणून काही तरुण उच्चपदावर जाऊनही जमिनीवर असतात, ज्या गावात जन्म झाला त्या गावाशी नाळ कायम ठेवणारे अनेक भूमिपुत्रही पाहावयास मिळतात.
देऊळगावराजा तालुक्यातील गिरोली खुर्द या छोट्याशा गावातील तरुणाने जिद्द व चिकाटीच्या बळावर अनिल रामदास म्हस्के यांनी ‘एसपी’ पदाला गवसणी घातली.आपण जसे यश संपादन केले तसे यश गावातील प्रत्येक युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येते असा विश्वास व्यक्त केला. देशासाठी काहीतरी करायचं हा दृष्टिकोन बाळगत तरुणांना दिशा देण्यासाठी त्यांनी गावात सुसज्ज ग्रंथालय सुरू करून परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
गिरोली खुर्द येथील अनिल म्हस्के यांची दोन वर्षांपूर्वी ‘यूपीएससी’ परीक्षेतून पोलिस अधीक्षकपदावर निवड झाली. ट्रेनिंगनंतर सध्या ते नागपूर जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर कर्तव्य बजावीत आहेत. ग्रामीण भागातून क्लासवन अधिकारी म्हणून पदावर पोहोचलो त्या मातीतील तरुणांसाठी काहीतरी करावे, हे ठरवून म्हस्के यांनी आपल्या आजीच्या नावाने गंगाई ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केली. सध्या या ग्रंथालयात कला, साहित्य, विज्ञान आदी विषयांसोबतच थोरांच्या चरित्रापासून तर बालसाहित्यापर्यंत सर्व प्रकारची ५०० पेक्षा अधिक पुस्तके ग्रंथालयात त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तक घरी नेण्याची देखील सुविधा मिळत आहे.अनिल म्हस्के यांचे वडील रामदास म्हस्के, आई भागूबाई म्हस्के हे दोघे सध्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे कामकाज पाहत आहेत. येणाऱ्या प्रत्येक तरुणाला आपल्या मुलाची यशोगाथा सांगून तुम्हीही त्याच्याप्रमाणे अभ्यास करून स्वतःचे, गावाचे व आई-वडिलांचे नाव घेतले जाईल असे उत्कृष्ठ दर्जाचे काम करा असा मोलाचा संदेश ते नेहमी देत असतात. गिरोलीसह परिसरातील जवळपास ८० विद्यार्थी सध्या या ग्रंथालय व अभ्यासिकेतून आपल्या ज्ञानकक्षा रुंदावत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातून अधिकारी झालेले अनिल म्हस्के यांच्यापासून प्रेरीत होऊन गावातील अनेक मुले-मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अनिल म्हस्के यांच्यापासून प्रेरणा घेऊन शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थीही आतापासूनच या ग्रंथालयातील पुस्तके वाचून,ज्ञानाचा पाया मजबू करत आहेत.
ज्ञानदानाचे अनमोल कार्य या ग्रंथालयाच्या माध्यमातून होत आहे, असेच कार्य प्रशासनातील उच्च पदावर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने करायला हवे तेव्हा कुठेतरी ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणणे उचित राहील. हाच आदर्श घेऊन यशस्वी तरुणाने सहकार्याची भावना जागृत करावी तेव्हाच देशातील ग्रामीण भागाततील अनेक तरुण देशासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.