मातृतीर्थ छावा

साखरखेर्डा घनदाट वस्ती असलेल्या महत्वाच्या गावांत प्रवासी निवारा नाही,प्रवाशांचे होत आहे बेहाल !

साखरखेर्डा घनदाट वस्ती असलेल्या महत्वाच्या गावांत प्रवासी निवारा नाही,प्रवाशांचे होत आहे बेहाल !

साखरखेर्डा : (मातृतीर्थ छावा न्यूज – नारायण म्हस्के) सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा गावाची लोकसंख्या इतर गावच्या तुलनेत जास्त आहे. या गावाला पाहिजे तसे लोकप्रतिनिधींकडून झुकते माप दिले गेले नाही, त्यामुळे आजपर्यंत हक्काचे बसस्थानक लाभले नाही. सध्याच्या स्थितीत उन्हाची दाहकता वाढत आहे सूर्य अक्षरशः आग ओकत असून, तापमान ४२ डिग्री सेल्सिअस असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे त्यात प्रवाशांची संख्या आणि गैरसोय यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे,प्रवाशांना निवारा नसल्याने बसस्थानकात लिंबाचे वृक्षच प्रवासी निवारा म्हणून तळपत्या उन्हात प्रवाशांना आधार देत आहेत.आमदार, खासदार जनतेचे सेवक म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी करतात काय?; असा संतप्त सवाल प्रवासी करत आहे.

इतर जिल्ह्यातील प्रवासी या ठिकाणी उतरल्यावर विचारतात बस स्थानक कुठे आहे तर त्यांना सांगावे लागते,आमचे बसस्थानक लिंबाचे झाड आहे असे उत्तर देण्याची वेळ आली आहे. आमदार मनोज कायंदे यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

साखरखेर्डा येथे कै.भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, एसईएस हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, जिजामाता विद्यालयात, उर्दू हायस्कूल, तीन जिल्हा परिषद शाळा, तीन खाजगी प्राथमिक शाळा, तीन इंग्लिश स्कूल, भारतीय स्टेट बँक, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, सात पतसंस्था, पोलिस स्टेशन, उपडाक घर, मंडळ अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नव्याने होत असलेले ग्रामीण रुग्णालय, पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -१, श्री पलसिध्द महास्वामी मठ, श्री प्रल्हाद महाराज संस्थान, आणि ग्रामपंचायत १७ सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी ग्राम पंचायत याप्रकाचे विविध कार्यालय असून देखील दुर्लक्षित साखरखेर्डा हे दिसून येत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील ६० किलोमीटर अंतरावर असलेले सर्वात शेवटच्या टोकावर ग्रामीण भागातील गाव असून,
साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत ५२ गावे सलग्न असल्याने,५२ गावांचा संपर्क येतो. जेव्हा प्रवासी बसस्थानकावर येतात त्यावेळी प्रवासी खोचक प्रश्न विचारतात साहेब हेच का तुमचे बसस्थाक, बसायला जागा नाही,महिलांना स्वच्छता गृह नाही. या भागातील लोकप्रतिनिधी खासदार,आमदार,मंत्री,

पत्रकार काय करतात असा प्रश्न मतदारसंघात उपस्थित होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी बसस्थानक व्हायला हवे होते परंतु राजकीय मानसिकते अभावी या गावाला बसस्थानक लाभले नाही.
या प्रकारच्या जनतेतून संतप्त प्रतिक्रिया दररोज उमटत आहे. साखरखेर्डा बसस्थानकावरील लिंबाचा मोठा वृक्ष हाच प्रवासी निवारा झाला आहे. त्या वृक्षाखाली अतिक्रमण वाढल्याने तेथेही बसण्यासाठी योग्य जागा नाही. त्यामुळे साखरखेर्डा येथील नागरिकांना आणखी किती वर्ष बसस्थानक आणि प्रवासी निवाऱ्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साखरखेर्डा गावात मोठ्या प्रमाणात ई-क्लास, गायरान जमिनीवर अतिक्रमण वाढले आहे त्या ठिकाणी लोकांनी ताबा करून जागा स्वतःच्या ताब्यात घेतली आहे.
या ठिकाणी महसूल आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी देखील त्यांना कागदपत्रे देऊन आर्थिक फायदा लाटत आहे.

प्रवाशांसाठी होणारी गैरसोय सोडवण्यासाठी बसस्थानकासाठी एक ठराव देखील घेतला गेला नाही, ही मोठी खेदाची बाब आहे.

लोकप्रतिनिधी काळजीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय लवकरात लवकर सोडावी अन्यथा जनता त्यांना येणाऱ्या काळात नक्कीच उत्तर देईल असे जनतेत लोकप्रतिनिधी विषयी नाराजी समोर येत आहे.

Exit mobile version